म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या दोन विद्यार्थिनींची सैन्यदलांत अधिकारी म्हणून निवड

पुणे, दि. ५ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत शिक्षण घेतलेल्या दोन विद्यार्थिनींची भारतीय सैन्यदलात अधिकारी म्हणून निवड झाली आहे. कु. दामिनी दिलीप देशमुख हिची भारतीय वायूसेनेत तर कु. पल्लवी सुनील काळे हिची भारतीय तटरक्षक दलामध्ये निवड झाली आहे.

कु. दामिनी ही इ. १२ वी च्या परीक्षेत शाळेत सर्वप्रथम आली होती. धनुर्विद्या आणि किक-बॉक्सिंग या खेळांमध्ये तिने राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करून अनेक पारितोषिके पटकावली आहेत. सैन्यात जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना दामिनीने या यशाचे श्रेय आपली शाळा आणि शिक्षकांना दिले आहे. “आज आभार नाही मानणार, तुमच्या ऋणातच राहायला आवडेल” असे तिने म्हटले आहे.

कु. पल्लवीने इ. १० वी च्या परीक्षेत शाळेत प्रथम क्रमांक मिळविला होता. तिनेही किक-बॉक्सिंगमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्या आहेत. भारतीय तटरक्षक दलामध्ये असिस्टंट कमांडंट पदासाठी निवड झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत ती देशात दुसरी आली आहे.

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या दोन विद्यार्थिनींची एकाच दिवशी सैन्यदलात अधिकारी म्हणून निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांच्या निवडीने राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. शाळा स्थापन झाल्यापासून गेल्या २२ वर्षात शाळेच्या १५ माजी विद्यार्थिनींची सैन्यदलात निवड झाली आहे.

कु. दामिनी आणि कु. पल्लवी या दोघींच्या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्त्रबुद्धे, शालासमितीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, शाळेच्या महामात्रा डॉ.मानसी भाटे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, शाळेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन विजय कुलकर्णी (निवृत्त) आणि शिक्षकांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या दोघींच्या यशाबद्दल शाळेत पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *